मराठा आरक्षणकरिता प्रसंगी बलिदानाची तयारी - विनायक मेटे
मुंबई, १ फेब्रुवारी/प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचे हित जपण्याकरिता बलिदान दिले. त्याचप्रमाणे मराठा
समाजाला आरक्षण लागू करण्याकरिता बलिदान देण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिली. मराठा आरक्षणाला विरोध करणारे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मेटे यांनी टीकेचे लक्ष्य केले. रस्ता रोको, मंत्र्यांना घरात कोंडणे व त्यानंतर आरपारची लढाई, असा भावी आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबत जनजागृती करणारा दौरा करून परतलेल्या मेटे यांनी ७२०० कि.मी. प्रवास करून १४५ जाहीर सभा घेतल्या. त्या दौऱ्याचा समारोप शिवाजी पार्क येथील आजच्या सभेने झाला. यावेळी यच्चयावत सर्व नेत्यांनी मेटे यांची तुलना अण्णासाहेब पाटील यांच्याशी केली. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील मराठय़ांचे अनभिषिक्त नेते असलेल्या शरद पवार यांना विनायक मेटे यांनी आव्हान दिल्याचे चित्र त्यांच्या समर्थकांच्या मनात निर्माण झाले आहे. खुद्द मेटे यांनीही सगळ्यांना सांभाळणाऱ्या बारामतीमधूनही आपल्याला भक्कम समर्थन असल्याचे स्पष्ट केले.
मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आपल्या समाजातील काही लोकांकडून जास्त विरोध होत आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी पहिले मराठा आहात हे विसरू नका. समाजातील जे बेईमान होतील त्यांचा बंदोबस्त करा. आम्ही मराठा समाजाबद्दल बोललो तर जातीयवादी ठरतो. मात्र समतावादी पुरोगामी ठरतात. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा मेळावा झाला. त्यामध्ये मराठा समाज आमचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यानंतर काही दिवसांतच विपरीत भूमिका घेतली गेली. काल तर आरक्षणाला विरोध करणारी बैठक छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण.. अशी भूमिका घेणाऱ्या या नेत्यांच्या ‘पण’ला आम्ही विचारत नाही. मिलीजुली सरकार असते तसे हे भुजबळ व मुंडे यांचे आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे असे असणाऱ्या या नेत्यांसह मराठा आरक्षणाला विरोध करणारे सारेजण आमचे कार्यकर्ते कडेला जाऊन उभे राहिले तर त्यामध्ये वाहून जातील, अशी टिप्पणीही त्यांनी केली. बापट अहवाल अन्यायकारक असल्याने आम्ही वापस केला, असे नमूद करून मेटे म्हणाले की, नवीन आयोगाचा फैसला लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला पाहिजे. वेळकाढूपणा करण्याकरिता या निर्णयाचा वापर सरकारने करू नये. अन्यथा आम्हाला एक घाव दोन तुकडे करावे लागतील. १६ फेब्रुवारीपर्यंत सरकारने हालचाल केली नाही तर सर्व तालुक्यांत रस्ता रोको आंदोलन केले जाईल. त्यानंतर सरकार हलले नाही तर मंत्र्यांच्या घरात घुसून त्यांना कोंडून ठेवले जाईल. त्याउपरही आरक्षण लागू झाले नाही तर शेवटची लढाई आरपारची असेल मग त्यामध्ये कुणीही संपले तरी मागे फिरायचे नाही.
मधू चव्हाण, कांता नलावडे यांचे आरक्षणाला समर्थन
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केल्याने पदत्याग करायला लागलेले भाजपचे आमदार मधू चव्हाण हे मराठा आरक्षणाच्या समर्थनाकरिता या मेळाव्याला हजर राहिले तर विधान परिषदेची उमेदवारी नाकारलेल्या कांता नलावडे यांनीही मेटे यांच्यासोबत व्यासपीठावर येऊन मुंडे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष नाराजी प्रकट केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment